कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायणांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारूपाला आले.
नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त सांप्रदायाशीप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या सांप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रदाय आणि नाथ सांप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही सांप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही सांप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत सांप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे.
नाथ सांप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. या दोघांचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित अनेक कथाही जन-मानसात प्रचलित आहेत. मत्स्येन्द्रनाथांनी त्यांच्या मासळी- आईच्या पोटात असतानाच शिव-पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ज्ञान, गाईच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मत्स्येन्द्रांना खाव्याशा वाटलेल्या वडय़ाकरिता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत.
मानवी देह कुठल्याही आश्रमात असो - ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, अगर संन्यासाश्रम, ह्या प्रत्येक जीवन प्रणालीला उपयुक्त अशी साधना त्यांनी सांगितली. त्यांची धर्म संकल्पनाच वेगळी होती. प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता. उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार विचार विवेक पद्धती हाच धर्म त्यांनी मानला.
परंतु ती व्याख्या संकुचित कधीच नव्हती. त्यात मानवधर्म हाच अभिप्रेत होता. तो सर्वांसाठी होता आणि विश्वात्मक होता. प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थित असलेला तो परिपूर्ण असा नाथांना अभिप्रेत असलेला मानवधर्म होता आणि आहे. नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली. कालाच्या स्थित्यंतरांत जीवन पद्धतीत अमूलाग्र बदल झाला. अस्थिरता वाढली. अशा परिस्थितीत योगाचरण अशक्य नाही, परंतू फारच अवघड झाले म्हणून नाथांनी पूर्वापार सिद्ध असलेल्या भक्तिमार्गाला चालना दिली. नाथसंप्रदायातील विष्णूपूजन, ह्या सगुण भक्तीची साक्ष देते. ज्ञानोत्तर भक्ती सारखेच भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला, डोळस भक्ती शिकविली. तसे अपार योग्यतेचे नाथशिष्य निर्माण केले. श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथ घडविले आणि श्री निवृत्तीनाथांनी आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडविले. परंपरा खुप वाढली आणि वाढत आहे. उच्चकोटीची ग्रंथसंपदा निर्माण झाली. भक्तीचा पूर लोटणारा वारकरी सांप्रदाय उदयास आला. भक्तीचे एक वेगळे पर्वच सुरु झाले. मानवतेच्या उद्धाराचा प्रत्येक मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी विश्वाला प्रदान केला. हे एक महान कार्य आहे. ह्या मार्गात कोणाचाच अव्हेर नाही. त्यांनी नाथतत्व आपल्यापुढे मांडले आहे. दिव्य नाथांनी हे काम केले आहे. ते कृतीत उतरविणे ह्यातच आपला उद्धार आहे. कोणीही अनाथ नाही. नवनाथ व चौर्यांशी सिंध्दांना हृदयाच्या अंतःकरणातून आदेश.
विश्ववंद्य माऊली श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली श्रेष्ठ गुरु परंपरा सांगतांना हा वरील अभंग रचलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते.
भागवतामध्ये दिलेल्या माहितीनुसार ऋषभदेवाचेएकूण १०० पुत्र होते असे वर्णन आहे, त्यापैकी नव विरक्त होते तेच हे नव नारायण कवि, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभंजन आणि यानींच कलीयुगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार पृथ्वीवर नवनाथ रुपाने पुन्हा अवतार घेतला. त्यांची क्रमश: नावे;
नाथ सांप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात. तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिध्द आहे.
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरले सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत. शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उमलले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते.
मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्मले म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिननाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातीरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.
श्री मच्छिंद्रनाथांच्या जन्मउत्सवा (ऋषिपंचमी) निमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगांव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करत आहे असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तिच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतंन्य समाधी आहे तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे. हि देवी नाथांनी मानलेली बहिण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्याला "देव तळ" (तलाव) म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नविन रस्ता झालेला आहे.
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथांना गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायणाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे.
येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालिंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्यांचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मठीला जाता येते.
उपरिचर वसूचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्यांना पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (विटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्यांचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रेयांनी त्यांना अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान, भागिरथी च्या तिरी तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो. या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे काही शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात.