• office@badebabamachindranathshaktipeeth.com
  • +९१ ८००७९ ९८५८५ / +९१ ८००७५ ३१०००

|| चैतन्य मच्छिंद्रनाथांची जन्मकथा ||

एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत-फिरत यमुनेतिरेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. उपरिचर वसू यांचे तेज प्रसवले त्याचा एक भाग यमुनेत पडला, तो एका माशाने गिळला. त्या माशाच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागला . पण ज्या एका माशाने वीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.

उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा माशाच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.


मच्छींद्रनाथ माशाच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या माशाने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट पालनपोषण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लगोलग पाण्याबाहेर आला आणि त्यास बर्‍याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिराला.

त्या माराच्या तिरिमिरीसमसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला.

इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.

अलख निरंजन आदेश आदेश आदेश . . .